नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये कोण विजयी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? कुणाला किती मते पडतील? आदी चर्चा सुरु आहेत. दरम्यान हे ४ जूनला स्पष्ट होणारच आहे परंतु तरीही त्याआधी समोर येतील ते एक्झिट पोल. भारतामध्ये तसेच इतर देशांमध्ये हे एक्झिट पोल लोकप्रिय आहेत.
एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला निवडणुकीत किती जागा मिळतील, याचा ढोबळमनाने अंदाज व्यक्त केला जातो. आपल्याला असे दिसून येते की, अनेकदा एक्झिट पोलचा निकाल आणि निवडणुकीचा निकाल जवळपास सारखाच असतो. तसे झाले की, संबंधित संस्थेची विश्वासार्हता वाढते.
याच्या उलट, एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलेले अंदाज आणि वास्तवातील निकाल परस्परविरुद्ध असतात, असेही घडते. काही लोक एक्झिट पोलवर विश्वास ठेवतात, तर काहींचा त्यावर भरवसा नसतो. आता या ठिकाणी आपण हे एक्झिट पोल नेमके कधी सुरु झाले? कोणत्या देशात झाले? भारत कधी आले? त्यानंतर त्याची नियमावली काय असते ते जाणून घेऊयात..
१९६७ मध्ये पहिला एक्झिट पोल अमेरिकेत
जगातील सर्वात पहिला एक्झिट पोल नेमके केव्हा झाला, यावरही मतमतांतरे आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र अभ्यासक आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली, असे म्हटले जाते. त्यानुसार १५ फेब्रुवारी १९६७ रोजी जगातील पहिला एक्झिट पोल पार पडला होता.
तथापि, त्यापूर्वी म्हणजे १९३६ मध्ये अमेरिकेत पहिला एक्झिट पोल झाला होता, असेही दाखले दिले जातात. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन या जोडगोळीने न्यूयॉर्क शहरात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सर्वेक्षण केले होते.
भारतात १९९६ मध्ये
भारतात एक्झिट पोलची सुरुवात होण्यासाठी १९९६ साल उजाडावे लागले. ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ या संस्थेने देशातील पहिला एक्झिट पोल घेतला होता. या एक्झिट पोलमध्ये निष्कर्ष काढण्यात आला, की भारतीय जनता पक्ष लोकसभेची निवडणूक जिंकेल. हा अंदाज बरोबर ठरला होता असे म्हटले जाते.
नियमावली देखील असते
भारतात केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलसाठी काही नियम तयार केले आहेत. मतदारांची फसवणूक किंवा निवडणूक प्रकियेवर प्रभाव टाकण्यापासून रोखणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेला अंदाज मतदानादिवशी प्रसारित करता येत नाही.
एक्झिट पोलचा निकाल मतदानानंतर प्रसारित करण्यासाठी सर्वेक्षण संस्थेने निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. एक्झिट पोलचा निकाल प्रसारित करत असताना, सर्वेक्षण संस्थेने आधीच स्पष्ट केले पाहिजे, की हे केवळ अंदाज आहेत. यासह असे काही नियम एक्झिट पोलसाठी बनवले गेले आहेत.