महाराष्ट्रामध्ये समाजातील विविध घटकांकरिता ज्या काही योजना राबवण्यात येतात त्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक लाभ देण्यात येतो. तसेच काही योजनांवर घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा योजना तसेच बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना यासारख्या योजना देखील राबवल्या जातात.
समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र मध्ये असे अनेक महामंडळ आहेत की ते विशिष्ट अशा प्रवर्गाच्या लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतात व त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
पद्धतीने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ देखील एक महत्त्वाचे असून या महामंडळाच्या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाकरिता कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
वसंतराव नाईक महामंडळाच्या सुविधा
राज्यातील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष योजना राबविण्यात येत असून यामध्ये 25% बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच गट कर्ज व्याज परतावा योजना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक लाख रुपये पर्यंत थेट कर्ज योजना इत्यादी महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत असून पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवश्यकता आहे व त्यासंबंधीचे आवाहन देखील करण्यात येत आहे.
महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा योजना कोणत्या बँकांकडून राबविण्यात येतात?
वसंतराव नाईक महामंडळाकडून ज्या काही वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येतात त्या प्रामुख्याने राज्यातील राष्ट्रीयकृत बँका तसेच राज्यस्तरीय बँकर समिती सदस्य असलेल्या बँका तसेच इतर सहकारी बँका, नागरी बँका, राज्यातील सर्व शेडूल आणि मल्टी शेड्युल बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या महामंडळाकडून राबवण्यात येणारी 25% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 50 वर्षे असणे गरजेचे आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर हे बँकांच्या नियमाप्रमाणे लागू राहतील.
वसंतराव नाईक महामंडळाकडून ‘याकरिता’ मिळते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज
वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येते व या योजनेअंतर्गत शेती संलग्न व पारंपारिक उपक्रमांकरीता, लघु, मध्यम उद्योगांचे उत्पादन व विक्रीकरिता व सेवा क्षेत्रासाठी देखील कर्ज वितरित करण्यात येते. या कामासाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठीची कमाल कर्ज मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत आहे.
या दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असणे गरजेचे आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे कर्ज खात्याशी आधार जोडणी करणे अनिवार्य आहे व महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे देखील अनिवार्य आहे. तसेच अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
या सगळ्या योजनांसाठी अर्ज करण्याकरिता व अधिक माहितीसाठी या ठिकाणी साधा संपर्क
तुम्हाला देखील वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी….
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ( मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे या ठिकाणी संपर्क साधने गरजेचे आहे व तशा प्रकारचे आवाहन देखील जिल्हा व्यवस्थापक एस. आर.बडगुजर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.