Successful Farmer: देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. विशेष म्हणजे आता नवयुवक शेतकरी तरुण देखील शेती (Farming) व्यवसायाला कंटाळून नोकरी व उद्योगधंद्याकडे वळत आहेत.

मात्र असे असले तरी, देशात असे अनेक शेतकरी आहेत जे शेतीसोबतचं शेतीपूरकव्यवसाय (Agri Business) करून करोडो रुपयांची उलाढाल करत आहेत. हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेती पूरक व्यवसाय सुरू करून करोडो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

यमुनानगर जिल्ह्यातील सुभाष कंबोज नामक शेतकऱ्याने मधमाशी पालन (Bee Keeping Business) या शेतीपूरक व्यवसायातून करोडो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. सुभाष यांनी अवघ्या साडे पाच हजारात मधमाशी पालन व्यवसाय सुरू करून आपला व्यवसाय तब्बल दोन कोटींची उलाढालीपर्यंत नेला आहे. यामुळे त्यांची संपूर्ण देशात चर्चा रंगली असून भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी (Narendra Modi) यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

सुभाष कंबोज इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात पुन्हा एकदा रादौर ब्लॉकच्या हाफिजपूर गावातील मधमाशीपालन करणारे प्रगतीशील शेतकरी सुभाष कंबोज यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. इतर शेतकरीही त्यांच्याप्रमाणे मधमाशी पालन व्यवसाय स्वीकारून स्वावलंबी बनावे असे देखील पंतप्रधानांनी नमूद केले. मध उत्पादनात अधिक क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

सुभाषप्रमाणेच व्यवसाय करणाऱ्या तरुणांना मधमाशी पालन व्यवसाय स्वयंरोजगार बनवू शकतो. मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 28 मार्च 2021 रोजीही पंतप्रधानांनी शेतकर्‍यांना कंबोजप्रमाणे व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. जाणकार लोकांनी सुभाष यांना फोनवरून याबाबत सांगितले. सुभाष आणि त्यांचे कुटुंब मन की बात कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता त्यांनी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याचेही ठरवले आहे.

सहा पेट्यांसह मधमाशीपालन सुरू केले:- पंतप्रधान म्हणाले की, 1996 मध्ये सुभाष कंबोज यांनी सहा पेट्यांसह मधमाशीपालन सुरू केले. शास्त्रोक्त पद्धतीने काम करत आज त्यांच्याकडे दोन हजारांहून अधिक मधमाशांच्या पेट्या आहेत. इतर लोकांना रोजगार दिला आहे. माजी शिक्षकांची व्यवसाय शैली स्वावलंबनाच्या क्षेत्रात एक उत्तम उदाहरण आहे.सुभाष सांगतात की, ते एका खाजगी शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडे 10 एकर जमीन आहे.

1996 मध्ये खादी ग्रामोद्योगातून मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 5500 रुपयांत सहा पेट्या घेऊन मधमाशी पालनाचे काम सुरू केले. कठोर परिश्रम करून आता त्यांची उलाढाल दोन कोटींहून अधिक आहे. हंगाम आणि फुलांच्या उपलब्धतेनुसार मधमाश्यांच्या पेट्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलवल्या जातात.

स्वत: मध विकतात:- सुभाष कंबोज स्वतः मध विकतात. ते इतर शेतकऱ्यांकडूनही मध खरेदी करतात. त्यांच्या मते बाजारात चांगल्या मधाला खूप मागणी आहे. त्यांचे मध तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये विकले जाते. ऑर्डर स्वतःहून येतात. मोहरीच्या फुलांचे मध अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये जाते. मोहरीच्या फुलांपासून मधमाशांनी तयार केलेल्या मधाला परदेशात जास्त मागणी आहे.