Surat Chennai Greenfield expressway :- अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्या प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेसाठी जमीन संपादित होणाऱ्या नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले देखील उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्याचे आणि शंकांचे सविस्तर निरसन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले बाधित होणाऱ्या शेतकऱ्याचे प्रत्येक मुद्दे प्रशासन ऐकून घेत आहे. नियमानुसार अंमलबजावणी करताना एकाही बाधित शेतकर्‍याचे नुकसान होऊ देणार नाही.

नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी,शेंडी धनगरवाडी, कापूरवाडी,भिंगार, पिंपळगाव उज्जैनी,शहापूर, पोखर्डी, सारोळा बद्दी या गावांच्या शिवारातून प्रस्तावित सुरत-हैदराबाद रस्ता जात आहे.

याच संदर्भात पिंपळगाव माळवी आणि मांजरसुंबा या गावातील शेतकरी आपले म्हणणे आणि शंका मांडण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समवेत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या संभाव्य प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस ‘वेसाठी नगर तालुक्‍यातील दहा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.

येत्या दि.१९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बाधित शेतकऱ्यांनी साकडे घालण्याचा प्रस्ताव माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे मांडला होता.

त्यावर याबाबत जिल्हाधिकारी हेच नियमानुसार कारवाई करणार आहेत. त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांशी कर्डिले यांनी जिल्हाधिकाऱयांचासंवाद घडून आणला. यावेळी राम गुंड,सनील झिने, संभाजी आढाव, अर्जन कदम, आंबदास कदम, शशिकांत गायकवाड, भानुदास झिने,भिमा झिने, किसन शिंदे. गोरख दुसुंगे, विलास ठाणगे, रोहिदास झिने, सर्जेराव झिने, प्रशांत झिने, सुरेंद्र शिंदे, शंकर वाकळे, तुकाराम ठाणगे, गोरख झिने, छगन कदम, विनायक झिने, अशोक भगत, दिलीप झिने आदी शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला ! पण आधी ‘हे’ काम होणार
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकार्‍यांनी सविस्तरपणे प्रत्येक शेतकर्‍याचे म्हणणे ऐकून घेतले. मांजरसुंबा आणि पिंपळगाव माळवी या
गावातील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी आपले प्रत्येक म्हणणे मुद्देनिहाय जिल्हाधिकाऱयांच्यासमोर मांडले.

त्या प्रत्येक मुद्दयाची जिल्हाधिकारी यांनी कायद्यानुसार सविस्तर उत्तरे दिली. जिल्हाधिकारी म्हणाले, संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा पाचपट मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. मूल्यांकनकरताना पिक नोंद पहाणी तसेच प्रत्यक्ष परिस्थिती, सिंचन परिस्थिती, याचीही नोंद घेतली जाणार आहे.

मूल्यांकनाच्या ‘मोबदल्याबाबत शेतकर्‍यांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे. जमीन संपादन केल्यानंतर काही तुटपुंजी जमीन शिल्लक राहत असेल तर त्याही बाबतीत नुकसान भरपाई देण्यासाठी निर्णय घेतला जाईल.

शेतकऱ्यांच्या काही मुद्दयाबाबत आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी यंत्रणेस यापूर्वीच सुचित केले आहे. या प्रकल्पाच्या संबंधित प्रत्येक बाधितशेतकऱ्याचे समाधान आणि म्हणणे ऐकून घेण्यासाठी एकूण आठ बैठका घेतल्या असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी म्हणाले, बाधित शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे विषयी थोडक्यात
या सहा पदरी महामार्गामुळे सुरत चेन्नई हे सोळाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या 1250 किलोमीटरवर येणार आहे. या महामार्गामुळे नाशिक सुरत हे अंतर 176 किलोमीटर एवढच राहणार आहे.

हा सहा पदरी महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती सांगितली गेली आहे.

संगमनेर तालुका :- 13 गावे – 282 हेक्टर जमीन
राहता तालुका :- 5 गावे – 94 हेक्टर जमीन
राहुरी तालुका :- 19 गावे – 428 हेक्टर जमीन
नगर तालुका :- 10 गावे – 256 हेक्टर जमीन
जामखेड तालुका :- 13 गावे 302 हेक्टर जमीन

या राष्ट्रीय महामार्गामुळे राज्यातील विकासाला गती मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे देशातील प्रमुख औद्योगिक शहरांसाठी प्रवास सुलभ होणार असल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.