Animal Husbandry:- भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय पूर्वापार पासून केला जातो व शेतीशी निगडित असलेला हा प्रमुख जोडधंदा आहे. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो.
पशुपालन व्यवसायामध्ये देखील आता अनेक प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी करू लागले आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शिरकाव पशुपालन व्यवसायात झाल्याने पशुपालन व्यवसाय आता फायद्याचा होताना दिसून येत आहे.
तसेच पशुपालन व्यवसायात विकास व्हावा व दूध व्यवसायाला चालना मिळावी याकरिता राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून देखील अनेक पावले उचलण्यात येतात.
अगदी याचप्रमाणे प्रत्येक जनावरांना टॅगिंग करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आलेले होते व आता याच्याही पुढे जात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांसाठी मसल प्रिंट हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या लेखात आपण नेमके हे मसल प्रिंट तंत्रज्ञान काय आहे व त्याचा उपयोग काय होतो? त्याबद्दल माहिती घेऊ.
राज्यात 30 हजार जनावरांमध्ये वापरले जाणार मसल प्रिंट तंत्रज्ञान
आपल्याला माहित आहे की जनावरांविषयी संपूर्ण माहिती कळावी याकरिता जनावरांना टॅगिंग करण्यात आलेले होती. या टॅगिंगच्या माध्यमातून त्या जनावराच्या बद्दल संपूर्ण माहिती तात्काळ उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच टॅगिंगमध्ये संबंधित टॅग हा जनावरांच्या कानाला टोचला जायचा.
परंतु बऱ्याचदा हा टॅग हरवला तर जनावरांनी बद्दलच्या माहिती मिळण्यात अडचण निर्माण होते व अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे आता पशुपालकांना मसल प्रिंटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मसल प्रिंट म्हणजे जनावरांच्या चेहरा समोरील भागाचे स्कॅनिंग करणे हे होय.
सध्या मसल प्रिंटचा प्रयोग हा 30 हजार गाईंमध्ये प्रायोगिक स्तरावर संपूर्ण राज्यात करण्यात येणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली. तसेच या व्यतिरिक्त आता 751 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेतून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ इतर अनेक उपक्रम राबवणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली व यामध्ये या मसल प्रिंट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.
ज्याप्रमाणे व्यक्तीच्या आधार कार्ड वरून त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. अगदी त्याच पद्धतीने टॅगिंगच्या माध्यमातून देखील जनावरांशी संबंधीचे सर्व माहिती देण्यात येणार आहे. जनावरांच्या कानांवर हे टॅग लावले जातात व नॅशनल डिजिटल डेटा प्लेटफॉर्मर त्या आधारित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. परंतु कानातील टॅग हरवल्यानंतर पुढे बरेच प्रश्न निर्माण होतात व या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मसल प्रिंटचा वापर करण्याचे ठरवले आहे.
कसा केला जाणार ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर?
या तंत्रज्ञानात जनावरांच्या नाकाजवळ जो काही काळा भाग असतो त्याचा वापर केला जातो. त्या ठिकाणी माहिती नोंदवली जाते व विशिष्ट स्कॅनर चा वापर करून ही माहिती उपलब्ध करून घेता येते. याकरिता इव्हर्स कंपनीशी केंद्र सरकारने करार देखील केला आहे. या कंपनीसोबत आता राज्य सरकार पहिल्या टप्प्यात 30,000 जनावरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यानंतर या तंत्रज्ञानाचा उपयोग लक्षात घेत राज्यातील सर्व जनावरांसाठी हे तंत्रज्ञान वापरण्याबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.