लागवडीसाठी शेती तयार करताना दगड आणि गोट्यांची अडचण येते का? त्यासाठी करा ‘या’ यंत्राचा वापर आणि मिटवा शेतातील दगड-गोट्यांचा त्रास

Ajay Patil
Published:
stone picker machine

शेतीतील विविध कामांसाठी आता यंत्रे विकसित झाल्यामुळे आता शेतीतील अनेक अवघड कामे चुटकीसरशी कमीत कमी वेळेत पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. शेतीतील पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतरमशागत आणि पिकांची काढणी इत्यादीकरिता अनेक यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत.

यामध्ये जर आपण शेतीची पूर्व मशागत पाहिली तर बरेच शेतांमध्ये दगड किंवा गोटे आपल्याला आढळून येतात व शेत तयार करताना जेव्हा आपण नांगरतो किंवा रोटावेटर मारतो तेव्हा या दगड गोट्यांचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. अशा प्रकारचा त्रास प्रामुख्याने डोंगराळ भागातील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

शेतातील असे दगड वेचून काढून त्यांना शेताच्या बाहेर टाकणे खूप त्रासदायक ठरते. परंतु आता याकरिता देखील एक मशीन विकसित करण्यात आलेली असून त्या मशीनचे नावे स्टोन पिकर हे होय. या मशीनच्या सहाय्याने शेतातील दगड गोटे वेचून बाहेर टाकण्याचे काम अगदी सोप्या पद्धतीने करता येते.

 अशा पद्धतीचे असते स्टोन पिकर मशीन

शेती करताना किंवा डोंगराळ भागात जर शेती असेल तर अशावेळी बऱ्याच प्रमाणात दगड गोटे आपल्याला शेतात आढळून येतात. अशावेळी मशागत करताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर अशा दगड गोट्यांच्या शेतामध्ये तुम्ही लागवड केली तरी बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर खूप विपरीत परिणाम होतो.

याकरिता स्टोन पिकर म्हणजेच दगड उचलणारी मशीन खूप उपयुक्त ठरते. या यंत्राच्या साह्याने शेतातील दगड गोटे सहजपणे वेचून शेत व्यवस्थितरित्या स्वच्छ करता येते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे छोटे आणि मोठ्या प्रकारचे दगड गोटे एकाच वेळी उचलून शेताच्या बाहेर टाकते.

 हे यंत्र कशाप्रकारे ऑपरेट करता येते?

स्टोन पिकर मशीन हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऑपरेट करता येते. तुम्हाला जर एका एकर क्षेत्रातील दगड गोटे उचलायचे असतील तर तुम्ही दोन तासात ते उचलू शकतात. या यंत्राच्या साह्याने तुम्ही छोटे-मोठे सगळ्या प्रकारचे दगड गोटे वेचू शकतात. यामुळे  शेत चांगले तयार होते व पिकांची  लागवड करणे सोपे होते व पर्यायाने उत्पादनात देखील वाढ होते. म्हणजेच जमीन चांगली उत्पादनक्षम बनते.

 किती आहे स्टोन पिकर मशीनची किंमत?

बाजारामध्ये जर आपण स्टोन पिकर मशीनची किंमत पाहिली तर ती जवळपास चार लाख रुपयांपर्यंत आहे. साधारणपणे या यंत्राची निर्मिती करणाऱ्या कंपन्या पंजाबमध्ये जास्त प्रमाणात असून त्या ठिकाणी असलेल्या कंपन्याशी संपर्क साधून तुम्हाला या यंत्राची खरेदी करता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe