‘या’ यंत्राचा वापर करा आणि एका दिवसात करा दीड ते दोन हेक्टर भाजीपाला रोपांची लागवड! वाचा कसे काम करते हे यंत्र?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची लागवड, आंतरमशागत आणि काढणीच्या कामांकरिता आता विविध प्रकारची यंत्र विकसित करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा यामुळे वेळ आणि खर्च देखील वाचण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे.

यामध्ये जर भाजीपाला पिकांचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की बऱ्याच भाजीपाला पिकांच्या लागवडी अगोदर आपल्याला रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती करावी लागते व नंतर त्या रोपांची लागवड शेतामध्ये करावी लागते. परंतु अशाप्रकारे भाजीपाल्याचे पुनर्लागवड करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते आणि वेळ देखील तितकाच खर्च होतो.

परंतु आता अशा प्रकारे भाजीपाला रोपांची पुनर्लागवड  करण्याकरिता ट्रॅक्टर चलीत पुनलागवड यंत्रे विकसित करण्यात आलेली असून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या यंत्रांना ट्रॅक्टरच्या पीटीओच्या माध्यमातून ऊर्जा मिळते व त्यावर ते ऑपरेट होतात.

एवढेच नाही तर या यंत्रांच्या साहाय्याने मल्चिंग पेपर देखील अंथरता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राच्या मदतीने एकाच वेळी अनेक कामे करता येऊ शकतात.

भाजीपाला रोपांच्या लागवडीकरिता वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या मदतीने वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी तसेच ब्रोकोली आणि फुलकोबी सारख्या भाजीपाला पिकाची पुनर लागवड  करता येते. या यंत्राला आपण भाजीपाला ट्रान्सप्लांटर देखील म्हणू शकतो.

 स्वयंचलित भाजीपाला लागवड यंत्र त्याची कार्यपद्धती

या पद्धतीने जर भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर मात्र रोपवाटिकेमधून लागवडीकरिता रोपांची निवड करताना ती खराब किंवा काही इजा झालेली नसावी. नाहीतर लागवडीनंतर  मोठ्या प्रमाणावर नांगी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येक ट्रे यंत्रावर ठेवण्यापूर्वी रोपांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

या यंत्राच्या साह्याने रोपवाटिकेमध्ये तयार केलेल्या रोपांची लागवड करता येणे शक्य आहे. याकरिता रोपांची निर्मिती ही प्रो ट्रेमध्ये करावी लागते. या पद्धतीमध्ये रोपाच्या कपामध्ये रोप ठेवण्यासाठीच्या मजुरांमध्ये बचत होते. यामध्ये एक किंवा दोन मजूर या यंत्रावर ट्रे ठेवण्यासाठी लागतात.

या अगोदर अशा प्रकारची यंत्रे भारतात कमी उपलब्ध होती. परंतु आता भारतातील बरेच उद्योजक अशा प्रकारचे यंत्रे निर्मिती करू लागले आहेत. यामध्ये रोपाचा जो ट्रे असतो तो यंत्रावर ठेवल्यानंतर यांत्रिक हाताच्या मदतीने एक रोप उचलले जाते व ते जमिनीत खोचणाऱ्या कपात टाकले जाते.

हा कप जमिनीत घुसून एक खड्डा पाडतो व या खड्ड्यात रोप सोडले जाते. वर येताना खड्ड्यात माती पडून रोपांची मुळे झाकली जातात व कप पुन्हा आपल्या जागेवर येऊन ट्रे मधील पुढील रोप उचलतो व अशी प्रक्रिया सुरू राहून रोपांची लागवड करता येते.

रोपांचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा व त्यामध्ये सातत्य रहावे याकरिता ट्रे रोपांसह  मागील कनवेयर बेल्टवर लावलेल्या जाळीला गती दिली जाते व ती नियंत्रित करण्यासाठी पीआयडी कंट्रोल अल्गोरिदमचा वापर केला जातो. या प्रक्रियेने एका मिनिटात 40 ते 45 रोपांची लागवड करता येणे शक्य होते.

 अर्ध स्वयंचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्र

भाजीपाला रोपांची लागवड करण्यासाठी एका हेक्टरला साधारणपणे वीस ते पंचवीस मजुरांच्या आवश्यकता भासते.  या यंत्राच्या मदतीने  दीड ते दोन हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला रोपांची लागवड एका दिवसात करता येणे शक्य आहे. साधारणपणे मजुरांची संख्या पाहिली तर या यंत्रासाठी तीन मजूर पुरेशी ठरतात.

यामध्ये एक मजूर रोपे ट्रे मधून काढून रोपाच्या कपामध्ये टाकण्यासाठी लागेल तर त्याला रोपे पुरवण्याकरिता दोन मजुरांची आवश्यकता असेल. या यंत्राला ऑपरेट करण्यासाठी 35 ते 45 अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक असून ट्रॅक्टरचा वेग काम सुरू असताना ताशी एक किलोमीटर पेक्षा कमी ठेवणे गरजेचे आहे.