अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-   दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील पारनेर,संगमनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यात रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यात संगमनेर व पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत आहे.

या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुशंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील ४३ गावे १० ऑगस्टपूर्णपणे बंद करण्याचे आदेश तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी काढले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर भाळवणी येथे श्रीमती देवरे यांनी भेट दिली असता काही दुकाने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने येथील बाजारपेठेतील तीन दुकाने सील केले. कोरोना नियंत्रणात येईपर्यंत ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच कोरोना महामारी समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी तहसीलदार श्रीमती देवरे यांनी केले आहे. जर कोणी आदेशाचा भंग केल्याचे आढळून आल्यास त्या दुकानास कोव्हीड नियंत्रणात येईपर्यंत सील करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.