अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- दोघांच्या खूनाचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगारमध्ये अटक केली आहे. शहानवाज लियाकतअली शेख (वय 38 रा. मुकुंदनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात शेखसह सात ते आठ जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 28 जुलै रोजी रात्री अंजूम नजीर तांबटकर (रा. घासगल्ली) व त्यांचा मित्र प्रकाश बाबुराव देहरेकर हे दोघे कोठला

येथील चहा टपरीवर थांबलेले असताना दुकान विक्रीच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनामध्ये धरून शेख याच्यासह सात ते आठ जणांनी तांबटकर व त्यांचा मित्र देहरेकर यांच्यावर लोखंडी रॉड, पाईपने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जखमी तांबटकर यांनी कोतवालीत फिर्याद दिली होती.

हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. पसार असलेला आरोपी शेख भिंगारमधील आलमगीर येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेख याला भिंगारमध्ये अटक केली.