अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने, त्या धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी,

तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय,

नगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ वा २३५६०४० वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. २३ जुलै २०२१ रोजी सकाळी दहा वाजता नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या

गोदावरी नदीत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८०७ क्यूसेक व भीमा नदीत दौंड पूल येथे ५२.०४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदीपात्रातील विसर्गातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे.

तसेच, पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, तसेच ओढे व नाले यांपासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे- नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.