file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात भूकंप, जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरीही अकोले तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे.

निळवंडे धरण निर्मितीच्या पूर्वी तालुक्याने प्रवरा नदीचे पूर अनुभवले आहे. दरम्यान प्रवरा नदीवर ८.३२ टीएमसीचे निळवंडे धरण साकारले. २००८ला धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून प्रवरेचा पूर तालुक्याने पाहिला नाही. रंधा, चितळवेढे, कळस येथे प्रवरेवर उंच पूल झाल्याने वाहतूक ठप्प होणे बंद झाले.

भंडारदरा व निळवंडे मिळवून १९.३२ टीएमसी पाणी अडविले जात असल्याने अचानक पूर येण्याची शक्यता आता राहिली नाही. तालुक्यात १९१ गावे असून, मुळा खोऱ्यात १२ ते १५ हजार क्यूसेकने पाऊस पाण्याचा विसर्ग आल्यास थोड्या-फार प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. प्रवरा नदी पात्रातून ४९ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला, तरच पूर परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती गेल्या १३ वर्षांत झालेली नाही.

निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.