file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्‍ही भाविकांना वेठीस धरणार असा सवाल भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकार आम्‍हाला रस्‍त्‍यावर येण्‍यास भाग पाडणार असेल तर, कोणतीही लढाई करण्‍याची आमची तयारी आहे.

मंदिरांसाठी आता यापुढेची लढाई आम्‍हाला न्‍यायालयातच करावी लागेल असा इशाराही त्‍यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्‍या अध्‍यात्‍म‍िक आघाडीच्‍या वतीने राज्‍यातील मंदिर सुरु करावीत म्‍हणून आंदोलनं करण्‍यात आली. अध्‍यात्मिक आघाडीच्‍या वतीने श्रीक्षेत्र कोल्‍हार येथील भगवती माता मंदिराच्‍या प्रांगणात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शंखनाद आंदोलनात आ.विखे पाटील सहभागी झाले.

शासनाच्‍या नाकर्तेपणावर त्‍यांनी सडकून टिका करताना भाविक, वारकरी आणि अध्‍या‍त्‍म क्षेत्रातील व्‍यक्तिंच्‍या भावनांशी तुम्‍ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्‍या वारीवर बंधन घालून तुम्‍ही वारक-यांचा अपमान केलेलाच आहे आता अधिक अंत पाहू नका अन्‍यथा या भावनांचा उद्रेक होईल अशा शब्‍दात त्‍यांनी सरकारला खडेबोल सुनावले. या आंदोलनात माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील,

डॉ.भास्‍करराव खर्डे, सभापती सौ.नंदाताई तांबे, पंचायत समिती सदस्‍य बबलू म्‍हस्‍के, अशोक आसावा, उपसरपंच सौ.सविता खर्डे, संचालक स्‍वप्‍नील निबे, ह.भ.प नवनाथ महाराज म्‍हस्‍के, भारत महाराज धावणे, संभाजीराव देवकर, उदय खर्डे, भाऊसाहेब घोलप, शिवाजीराव घोलप, आण्‍णासाहेब बेंद्रे, विजय तांबे, ऋषीकेश खर्डे, धनंजय दळे, सर्जेराव खर्डे, बब्‍बाभाई शेख, तबाजी लोखंडे,

अमोल थेटे, दत्‍तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे आदिंसह अध्‍यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. मंदिर सुरु करण्‍याचे मागणीचे निवेदन आ.विखे पाटील यांनी तहसिलदारांना सादर केले. राज्‍यात एकीकडे दारूची दुकानं सरकारने सुरु केली. लसीचे दोन डोस घेतलेल्‍या व्‍यक्तिंना तुम्‍ही मॉलमध्‍ये परवानगी दिली, मुंबई मधील लोकलही सुरु केल्‍या मग मंदिरांबाबतच येवढी उदासिनता का?

असा सवाल उपस्थित करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, या सरकारच्‍या विरोधात सर्वच समाज घटकांना रस्‍त्‍यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे. अध्‍यात्‍म‍िक क्षेत्रही आता बाजूला राहीलेली नाहीत. मंदिरांची दारं उघडावीत म्‍हणून दिड वर्षापासुन सर्वांची मागणी आहे पण या बही-या, मुक्‍या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्‍याही भावना राहीलेल्‍या नाहीत अशा शब्‍दात महाविकास आघाडी सरकारवर टिका केली.

आधिवेशन आलं की, राज्‍यातील कोव्‍हीड वाढतो, सण, उत्‍सव आले की, या सरकारला लॉकडाऊनची आठवन होते. शाळा सुरु करण्‍यासाठीही सरकार तारीख पे तारीख जाहीर करते. हे सरकार संपूर्णपणे गोंधळलेले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय शेवटपर्यंत टिकत नाहीत, मंदिरं बंद ठेवली मग मंत्र्यांचे दौरे थांबलेत का? मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले.

अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्‍ही भाविकांना वेठीस धरणार असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला. मंदिर परिसरातील व्‍यवसायीकांना दिलासा देण्‍यासाठी आणि भाविकांच्‍या श्रध्‍देचा सन्‍मान करण्‍यासाठी मंदिरं सुरु करण्‍याचा निर्णय तातडीने घ्‍या अन्‍यथा सरकारच्‍या विरोधात यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्‍याचा इशारा आ.विखे पाटील यांनी दिला.