अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- अरणगाव (ता. नगर) हद्दीतील खडी क्रेशरच्या धुळीने शेतकर्‍यांची शेती नापीक होत असल्याने खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे थांबविण्याची मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

यावेळी नारायण पवार, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, सतीश पवार, योगेश पवार, संदीप साखरे, अंबादास कल्हापुरे, दत्तू गव्हाणे, भाऊसाहेब खंडागळे, पप्पू शिंदे, संदीप खंडागळे, बबन शिंदे, भाऊ साठे आदींसह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. अरणगाव हद्दीत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.

दिवसंदिवस या भागात खडी क्रेशरची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील चार ते पाच वर्षापासून खडी क्रशरमुळे शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात धुराळा उडून पिकांची नासधूस होत आहे. शेतकर्‍यांना पीक घेणे देखील अवघड झाले असून, धुळीच्या त्रासामुळे शेती कशी करावी? हा प्रश्‍न पडला आहे.

खडी क्रेशरबद्दल जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदन, तक्रार करुन देखील हा प्रश्‍न सोडविण्यात आलेला नाही. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सर्व शेतकर्‍यांचे कुटुंब आर्थिक संकटात असताना शेतीतून देखील धुळीच्या त्रासामुळे उत्पन्न मिळत नाही. तर सदर भागातील जमीन देखील नापीक बनली आहे.

खडी क्रशर चालकांना धुळीचा त्रास कमी करण्यास सांगितले असता शेतकर्‍यांना धमकाविण्याचे प्रकार घडत असल्याचे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले आहे.

शेतजमीनीत शेतकरी पीक घेत असताना त्यांना परवानगी दिलीच कशी जाते? हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशर असून आनखी नवीन खडी क्रेशर चालकांना परवानगी देण्याचे प्रकार सुरु आहे.

खडी क्रेशरच्या धुराळ्याने शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अरणगाव येथील खडी क्रेशरचे परवाने रद्द करुन नवीन परवाने देणे थांबविण्याची मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली असून, अन्यथा स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी दौंड महामार्गावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.