अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यात कोरोनासह म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यातच कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबवण्यात येत आहे.

तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम देखील राज्यात कार्यरत आहे. यातच आता राज्यातील आशा सेविकांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संगितले.

मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात.

ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत. त्यामुळे कोरोनाचा चाचणीच्या मोहिमेला वेग प्राप्त होणार आहे.