अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते राधाकृष्ण विखे-पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मंगळवारी (दि.१०) दिल्लीत झालेल्या भेटीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

देशात महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने नव्यानेच सहकार खाते निर्माण केले आहे. सहकार क्षेत्र हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा कणा आहे.

भाजपला हे खाते आपले शक्तीस्थान करायचे आहे. त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा देशातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहेत.

हर्षवर्धन पाटील दीर्घकाळ राज्याच्या मंत्रिमंडळात होते. सात वर्षांहून अधिक काळ त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. पणन मंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारने नेमलेल्या विविध राज्यांच्या पणन मंत्र्यांच्या देशपातळीवरच्या समितीचेअध्यक्षपद भूषवले होते.

तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिक्षण व कृषी खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. काँग्रेस पक्षाच्या मुशीत घडलेल्या व त्यातून बाहेर पडलेल्या हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी शहा यांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.

विशेषतः हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यास, अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. ही भेट राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल असे ही राजकीय वर्तुळात बोलले आहे.