अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- शाळा वर्गाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यमंत्री वेळेत पोहचले. मात्र जवळच्या काही कार्यकर्त्यांनी उशिराने लावलेली हजेरीमुळे राज्यमंत्री तनपुरे यांना करावी लागलेली प्रतीक्षा हा वरवंडी परिसरात चर्चेचा विषय ठरला.

तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १७ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या २ नवीन शाळा वर्गाच्या रविवारी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात हा प्रकार घडला. भूमिपूजन कार्यक्रमाची वेळ सकाळी साडेनऊची असल्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नियोजित वेळेत पोहचले.

मात्र, यावेळी बहुतांशी कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी हजर नव्हते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शाळेला भेट देऊन मुख्यध्यापिका यांच्याशी शाळा समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शाळेला स्वत:ची लाईट व्यवस्था नसल्याची माहिती पुढे आली. यावेळी शाळा प्रशासनाकडून एलइडी दिव्यांची मागणी, जुन्या शाळा खोल्यांची दुरुस्तीची मागणी करण्यात आली.

या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले. कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर तनपुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शाळा वर्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या भूमिपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, अण्णासाहेब सोडनर, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, वरवंडी ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, उपसरपंच पवार, ग्रामपंचायत सदस्य जगदीश भालेराव, सलीम शेख, बंटी अडसुरे, नितीन बरे, आदी उपस्थित होते.