वेळेवर वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची घडी विस्कटत आहे. अशी परिस्थिती असताना राज्य सरकार मात्र संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे.

पुढे बोलताना मुंढे म्हणाले, कोरोनासारख्या संकटकाळात जिवावर उदार होऊन एसटी कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या सेवेची राज्य सरकारने उपेक्षा केली आहे.

एसटीची कोट्यवधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा सरकारचा डाव असून त्यासाठी कर्मचाऱ्यास वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे..

दरम्यान ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचारी तुटपुंज्या पगारात जनतेची सेवा करताना कौटुंबिक समस्यांची पर्वा केली नाही.

महामंडळाच्या बेपर्वाईमुळे वेळेवर पगारदेखील मिळत नसताना सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरल्याने ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या आगारांमध्येच आपले जीवन संपविले.

मात्र, राज्य सरकारने त्याची साधी दखलही घेतली नाही. उलट संप संपविण्यासाठी आता पोलिसी बळाचाही वापर करून दडपशाही सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे.

यामुळे आता एसीटी कर्मचाऱ्यांसोबत आता सरकारशी संघर्ष करण्यासाठी भाजप राज्यभर संघर्ष चालूच ठेवणार असल्याचा इशारा मुंढे यांनी आज एका निवेदनाद्वारे दिला आहे.