file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- नगर शहरातील गुलमोहर रोडवरील जागृती कॉलनीमध्ये एका महिलेच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे गंठण दोघा चोरट्यांनी बळजबरी चोरून नेले.

भरदिवसा होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शोभा झावरे या दुपारच्या सुमारास जागृती कॉलनीमधून त्यांच्या घराकडे पायी जात होत्या.

त्या घराच्या गेटजवळ आल्या असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी झावरे यांच्या गळ्यातील गंठण तोडले. झावरे यांनी विरोध केला असता त्यांना ढकलून देत चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

याप्रकरणी शोभा भास्कर झावरे (रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

जागृती कॉलनी परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक निरीक्षक सुरसे करीत आहे.