file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.धुळे शहरात २५ जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर ३ ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही.

गेल्या दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. यापूर्वी ८ जून रोजी ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने मृत्यू झालेला शहरातील तो शेवटचा रुग्ण होता. ३१ डिसेंबर २०२० रोजी शहरात सर्वाधिक १११ रुग्ण बाधित होते. यानंतर ही संख्या कमी झाली.

५ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातील बाधितांची संख्या ५३ होऊन हा आकडा वाढत होता. २५ जुलै रोजी ही संख्या शेवटच्या एका रुग्णावर येऊन थांबली. नियमांची अंमलबजावणी, लसीकरण व प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळेच धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे.

एखाद्या शहर-गावात सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही किंवा कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार, हे शहर किवा गाव कोरोनामुक्त ठरते.