Tractor Subsidy : शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील एक कल्याणकारी योजना प्रशासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.

जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्वांगीण विकासासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची साहित्य 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.

या योजनेनुसार अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात 402 गटांनी योजनेचा लाभ घेतला आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहमदनगर जिल्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत कोणत्या शेती उपयोगी गोष्टींसाठी अनुदान मिळते तसेच कोणत्या लोकांना याचा लाभ घेता येणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

या योजनेचा लाभ नेमका कोणाला / योजनेच्या पात्रता 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. तसेच बचत गटाचे सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. आणि या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. निश्चितच ही योजना केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरू झाली आहे.

योजनेअंतर्गत काय-काय मिळणार बर…?

या योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने जसे की कल्टिव्हेटर किवा रोटाव्हेटर व ट्रेलरसाठी ९० टक्के अनुदान दिले जात असल्याची माहिती हाती आली आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तरी जाणून घ्या 

गट स्थापना समेची इतिवृत्ताची छायांकित प्रत.

अर्जदार स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष सचिव यांचे राष्ट्रीयीकृत बँक संयुक्त खाते पुस्तकाची छायांकित प्रत.

गटाचे सदस्य यांचे प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले जातीचे दाखले.

गटाचे सदस्य यांच्या आधार कार्डाच्या छायांकित प्रती.

गटाचे सदस्य यांच्या रेशनकार्डाच्या छायांकित प्रती.

गटाचे सदस्य यांचे प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले रहिवासी दाखले.

गट सद्य:स्थितीत अस्तित्वात असून, बचत गटाची नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र.

गटाचे अध्यक्ष सचिव व इतर सर्व सदस्य यांचा एकत्रित पूर्णाकृती फोटो.

मिनी ट्रॅक्टर स्वतः खरेदी करण्यास तयार असल्याबाबत १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र.

या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार बर…!

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची साहित्य खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने यांची कमाल किंमत तीन लाख 50 हजार रुपये गृहीत धरण्यात आली आहे. पात्र लोकांना या कमाल मर्यादेतच अनुदान मिळते. यामध्ये संबंधित पात्र लोकांनी दहा टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90% अनुदान म्हणजेच जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार अनुदान अनुज्ञय राहणार आहे.