अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांची बदली प्रक्रीया सुरू झाली असून, काल रात्री उशिरा संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांची बदलीचे आदेश आले.

दरम्यान, यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची प्रतिक्षा असून त्यांच्या जागेवर संगमनेरचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांची नगरला जिल्हा परिषदेत बदली झाली आहे.

दुसरीकडे मुळचे नगर जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले मनोज ससे यांची नगर जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदावर बदली झाली आहे.

यासह कृषी विभागातील जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांची नंदूरबार जिल्ह्यात उपसंचालक कृषी या पदावर बदली झाली असून त्यांच्या जागेवर अकोले तालुक्यातील रहिवासी आणि चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे शंकर किरवे यांची बदली झाली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या आणखी काही अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.