अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक आणि इतर छोट्या मोठ्या दुकानदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचा तुघलकी निर्णय विज वितरण कंपनीने तात्‍काळ मागे घ्‍यावा आशी मागणी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंघल यांना पत्र पाठवून शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या मोठ्या दुकानदारांसमोर कोव्हीड संकटामुळे निर्माण झालेल्या अर्थिक आव्हानांचे वास्तव चित्र विषद करुन

, विज वितरण कंपनीची विज कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम ही तुघलकी पध्‍दतीची असल्‍याने ती तातडीने थांबवावी अशी जोरदार मागणी त्‍यांनी केली आहे. मागील दोन वर्षापासून कोव्हीड संकटामुळे साईबाबांचे मंदीर बंद आहे. त्यामुळे भाविक येणे पूर्णपणे थांबले आहे. याचा मोठा परिणाम इथल्या स्थानिक व्यवसायांवर झाला असून, येणाऱ्या भाविकांवरच इथल्या व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असल्‍याने येणा-या भाविकांवरच येथील अर्थचक्र सुरु असते.

परंतू मागील दोन वर्षापासून शिर्डी शहर आणि परिसरातील अर्थव्‍यवस्‍था पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. यामुळे हॉटेलचालक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात अर्थिक संकटात सापडले आहेत. व्यावसायिक बँकाकडून घेतलेल्या कर्जाची तसेच इतर कुठल्याही करांची परतफेड करु शकत नाहीत ही वस्तूस्थिती आ.विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यासर्व परिस्थितीत वीज वितरण कंपनीने मोठ्या रक्कमाची बील देवून त्याची वसुली सुरू केली आहे. वास्तविक वीजेचा वापर झालाच नाहीतर मोठ्या रकमेच्या बीलांच्या वसुलीसाठी तगादा सुरू करणे आणि याच कारणाने थेट वीज कनेक्शन तोडण्याची विभागाची कारवाई ही व्यावसायिकांवर अन्यायकारक ठरत असल्याची खंत आ.विखे पाटील यांनी प्रामुख्याने पत्रातून नमुद केली आहे.

वीज कनेक्शन तोडण्याचा तुघलकी निर्णय वीज वितरण कंपनीने तात्काळ मागे घ्यावा अन्यथा हॉटेलचालक आणि व्यापारी यांच्यामध्ये मोठा असंतोष निर्माण होईल, यातून कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण होणाऱ्या परीस्थीतीची शक्यता लक्षात घेवून वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम तातडीने थांबवावी आशी मागणी आ.विखे पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.