file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीचे प्रमाण जरा जास्तच वाढले आहे. अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहे मात्र या भामटयांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

नुकतेच आणखी एक फसवणुकीची घटना शहरात घडली आहे. पत्ता विचारण्याचा बहाणा करून चौघांनी एका व्यापार्‍याचे सव्वा लाख रूपये व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीमधून लंपास केली.

कोठी रोडवरील मोतीनगरमध्ये गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली. व्यापारी हितेन प्रवीण मेहता (रा. कोठीरोड, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, व्यापारी मेहता गुरूवारी सायंकाळी कोठी रोडवरील त्यांच्या घरासमोर उभे असताना दोन दुचाकीवरून चौघेजण त्यांच्याजवळ आले.

त्यांनी मेहता यांना एका ब्लड बँकेचा पत्ता विचारला. पत्ता सांगत असताना दोघांनी मेहता यांचे लक्ष विचलित केले. तर अन्य दोघांनी गाडीच्या डिक्कीमधून सव्वा लाख रूपये व कागदपत्रे चोरली. मेहता यांना काही कळण्याच्या आत चोरटे रक्कम घेऊन पसार झाले.

गाडीतून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.