file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अवैध वाळू वाहतूक करणारे चार चाकी वाहन भरधाव वेगात असताना पानटपरीत घुसले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे घडला आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूरकडून भरधाव वेगात 2 ब्रास वाळू वाहतूक करणारे वाहन सुसाट वेगात हरेगाव फाटा दिशेने आले.

सदर वाहनाच्या मागे श्रीरामपूर येथील शासकीय वाहन पाठलाग करत असताना सदर वाहन चालकाने भरधाव वेगात समोरील पानटपरीला जोरदार धडक देत शेडच्या आत वाहन घुसवले.

प्रसंगावधान राखत टपरी चालकाने स्वतःचा जीव वाचविला. घटनेची माहिती समजताच परीसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चालकाने आडदांडपणा करत तसेच दमबाजीची भाषा वापरत तेथून वाळूचे वाहन घेऊन धूम ठोकली.

यावेळी वाळूचे वाहन टपरीत घुसल्याने टपरीधारकाचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली. पोलिसांनी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनचालकाचा शोध घेऊन वाहन ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.