Vihir Anudan Yojana : शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी शेती जमीन , पाणी आणि वीज या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अनेकदा शेतकरी बांधवांना पाण्याच्या अभावी नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते.

जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कोरडवाहू क्षेत्र बागायती क्षेत्राखाली आणने हेतू विहीर खोदण्याचा सल्ला देतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी बांधवांना पैशांच्या अभावामुळे विहीर खोदता येणे अशक्य बनते. अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच अनुदान उपलब्ध होत होते. मात्र आता शासनाने 4 नोव्हेंबर रोजी एका शासन निर्णयाच्या माध्यमातून विहिरींसाठी चार लाखांपर्यंतचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळतं, रोजगार हमी योजनेने यासंदर्भात कोणत्या सूचना जारी केल्या आहेत, अर्ज कसा करायचा ? अनुदानाची प्रक्रिया, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या अनुदानाच्या लाभाविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार विहिरीसाठी अनुदान?

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री कर्ता असलेले कुटुंब, शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंब, जमिनीसुधारणातील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर शेत जमीन असावी. याशिवाय लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावर याआधी विहिरीची नोंद नसावी, अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे जॉब कार्ड असावे तसेच शेत जमिनीचा दाखला किंवा सातबारा आवश्यक आहे.

रोजगार हमी योजना विभागाच्या महत्त्वपूर्ण सूचना

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आलेली सर्व कामे गतीने पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाकडून महत्त्वपूर्ण सूचना जारी झाल्या आहेत. तसेच विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर विहिर मागणीचे अर्ज संबंधित अर्जदार शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचे तसेच संबंधित अर्जदार शेतकऱ्याला अर्ज भरताना मदत करण्याच्या सूचना देखील विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी विहीर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा बर

शेतकरी बांधवांना सिंचित विहीर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकरी बांधवांनी विहित नमुन्यातील अर्ज, संमती पत्र व्यवस्थितरित्या भरून ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा किंवा जमा करावा. ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था असल्यास ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जासोबत सातबारा, नमुना नंबर 8 चा उतारा जोडावा लागणार आहे. जॉब कार्डची प्रत देखील अर्जासोबत देणे अपरिहार्य आहे.

ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर पुढील एक महिन्यात अनुदान मिळणार

विहिरीच्या अनुदानासाठी इच्छुक अर्जदार शेतकरी बांधवांना ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सादर केलेले अर्ज दर सोमवारी ग्रामपंचायतमध्ये बघितले जातील आणि अर्ज ऑनलाईन भरण्याचे काम ग्रामपंचायत कार्यालय करणार आहे. फक्त विहीर अनुदानासाठीच नाही तर मनरेगाचे सर्व मागण्यांचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरावे लागतात. ग्रामपंचायत मध्ये ग्रामरोजगार सेवक किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर शेतकरी बांधवांचे अर्ज भरण्याचे काम करणार आहेत. यानंतर अर्जाची पडताळणी करून सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या अर्ज ग्रामसभेतून मंजूर केले जाणार आहेत. याबाबत शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना मिळाल अनुदान

एका मीडिया रिपोर्टनुसार अहमदनगर जिल्ह्यातील एकूण सात हजार 337 शेतकरी बांधवांना एप्रिल 2022 नंतर विहीर अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 6 हजार 765 विहिरींची कामे पूर्ण देखील झाले आहेत. 572 विहिरींची कामे अपूर्ण असून नव्याने 146 विहिरींना मंजुरी देण्यात आले आहे. निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विहीर अनुदानाचा फायदा होत आहे.