file photo

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती.

त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावांत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी चालू सिंचन वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी गुरुवारी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे.

या आवर्तनातून सर्व पाणी योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असणार्‍या अनेक गावच्या स्थानिक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन मिळावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती.

त्या मागणीची व कोपरगाव शहरात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाणी टंचाईची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी निर्माण झालेली पाणी टंचाई पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊन

गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश देऊन गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

त्या मागणीनुसार गुरुवार पासून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. सर्व पाणीपुरवठा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने काळजीने भरून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.