अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून काल फिर्यादी गटाच्या वतीने रेखा जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी आरोपी बाळ बोठे याची पत्नी सविता बोठे हिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी सविता बोठे यांनी रुणाल जरे व त्याच्या अंगरक्षकाने धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सविता बोठे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझा मुलगा व मी २७ जुलै रोजी पारनेर दुय्यम कारागृहात पती बाळासाहेब बोठे यांना भेटण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन गेले असता, तेथे या प्रकरणातील फिर्यादीचा नातू रुणाल जरे व त्याचा अंगरक्षक आला होता.

त्यांनी मला व माझ्या मुलाकडे रागाने पाहून बघून घेऊ, अशी धमकी दिली. अ‍ॅड. सविता बोठे यांनी पुढे म्हटलं आहे, ‘रुणाल जरे यांचे पारनेर पोलिस ठाण्यात काम नसताना तिकडे चकरा का होतात? आम्हाला कोर्टाच्या कामासाठी सतत बाहेर पडावे लागते.

या पार्श्वभूमीवर मला आणि मुलाला जरे तसेच त्यांचे अंगरक्षक, वकील पटेकर यांच्यापासून धोका आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पोलिसांची सवय झाली आहे.

त्यामुळे पारनेर पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची तक्रार करणार नव्हतो. मात्र, उलट जरे यांनीच आपल्याविरूद्ध खोटी तक्रार केल्याचे समजल्यावर मी वस्तुस्थिती सांगण्याची ही तक्रार करीत आहे,’ असं अ‍ॅड. बोठे यांनी म्हटलं आहे. तसंच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.