अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैर काही लपून नाही. संधी मिळाली की दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा तसेच शाब्दिक हल्ला केल्याशिवाय राहतच नाही.

यातच आता या लढाईत नारायण राणे यांच्याबाजूने त्यांचे सुपुत्र देखील या शाब्दिक लढाईत उतरले आहे.
नुकतेच शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे पार पडला.

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून विरोधकांवर हल्लाबोल केला. याच अनुषंगाने नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

“दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या भाषणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल.