file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनामुळे आधीच गेल्या वर्षाहून अधिक काळ शैक्षणिक व्यवस्था ढवळून निघाली आहे. आता यातच काही विद्यार्थ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बीएस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेश द्या या मुख्य मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कृषी पदविकाधारकांनी काल सोमवारी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.

दरम्यान सविस्तर माहिती अशी कि, कृषी पदविकेनंतर बीएस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेश मिळतो मात्र प्रवेश नाकारल्याने कृषिपदविकाधारक विद्यार्थी यज्ञेश नागोडे या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच नेवासा तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने त्याने सोमवारी तहसील समोर उपोषण सुरू केले.

यज्ञेश नागोडे म्हणाला, मी भेंडे येथील जिजामाता कृषी महाविद्यालयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असून कृषी पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पदवीसाठी दुसर्‍या वर्षात प्रवेश मिळत असतो

मात्र आम्हाला प्रवेश नाकारला गेला असून यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ व शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. कृषी पदविकाधारक यज्ञेश संजय नागोडे हा विद्यार्थी उपोषणाचे नेतृत्व करत आहे.

उपोषणात मयूर जावळे, सचिन पेहरे, आदेश भोसले, साईनाथ चौघुले, अभिजित शेळके, निलेश गाडेकर, अनिकेत औटी, आकाश शिंदे, प्रविण शिंदे, विकास काळे, राहुल बर्फे, अभय गणगे, रामेश्‍वर गणगे आदींनी सहभाग नोंदवला आहे.