Maharashtra Rain | राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; चिंता वाढली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : राज्यात पाऊस ओसरला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. दरम्यान, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यांत झाला. दरम्यान, आतापर्यंत ९२६.४ मिमी इतका पाऊस झाला. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीच्या ९१.६० टक्के पाऊस पडलेला आहे.

गतवर्षी राज्यात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदाच्या पावसात त्यात पडलेल्या मोठ्या खंडाने चिंता वाढवली आहे. आता परतीच्या पावसाकडे लक्ष असून त्यावर राज्यातील धरणांमधील जलसाठा अवलंबून असणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले. २५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला. जून महिन्यात उशिराने पाऊस झाला.

त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असताना ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे काही भागात पिण्याची पाण्याची चिंता कमी झाली आहे. दरम्यान,

मंगळवारी राज्यातील बहुतांश भागात मुख्यतः पावसाची उघडीप होती. उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नसल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.