राज्यभर पावसाची जोरधार: संपूर्ण राज्यात पावसाचे धुवाधार बॅटिंग, वाचा आजचा एकंदरीत महाराष्ट्राचा आणि तुमच्या भागातील पावसाचा अंदाज

Published on -

जर आपण दोन दिवसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल साचल्यामुळे वाहतुकीला देखील समस्या निर्माण होत आहेत.

मुंबईमध्ये तर परिस्थिती जास्त बिघडली असून या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचल्याने बऱ्याच भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुंबईचे लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर देखील याचा अनिष्ट परिणाम होत आहे. विदर्भात देखील हीच परिस्थिती असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होईल की काय अशी शक्यता आहे. तसेच हवामान खात्याचा आजचा अंदाज पाहिला तर त्यानुसार राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 आजचा हवामान खात्याचा अंदाज

आजचा हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यानुसार रत्नागिरी, रायगड, ठाणे,पालघर,सातारा,पुणे,चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच रायगड,सिंधुदुर्ग,यवतमाळ,गडचिरोली,वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवल्यामुळे सचेत प्रणाली द्वारे या जिल्ह्यांना सुचित करण्यात आलेले आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जर आपण मुंबई हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असून दक्षिण व उत्तर कोकणामध्ये पावसाचे ढग आहेत.

त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सातारा या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

 शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम

शेतीच्या बाबतीत विचार केला तर या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून रखडलेल्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी पिकांचे नुकसान देखील होत असून जमीन देखील खरवडल्याच्या घटना घडत आहेत.परंतु खरिपाच्या दृष्टिकोनातून आणि जमिनीतील पाणी पातळी वाढण्याचे दृष्टिकोनातून हा पाऊस खूप महत्त्वाचा आहे.

 चंद्रपूर मध्ये पावसाचा उच्चांक

मंगळवारी चंद्रपूर शहरामध्ये तब्बल 260 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी चंद्रपूरला चार जुलै 2006 रोजी 230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. चंद्रपूर करिता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट  दिल्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. झालेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!