Maharashtra Rain: या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा! हवामान विभागाकडून देण्यात आला अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain:- संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान  विभागाकडून वर्तवण्यात आली असल्यामुळे राज्यातील बळीराजासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जर यावर्षी आपण पावसाची स्थिती पाहिली तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवातच मुळात निराशाजनक झाली. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात संपूर्ण राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस बरसला व खरिपाच्या ज्या काही रखडलेल्या पेरण्या होत्या त्यांना वेग आला होता.

त्यानंतर मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडाठाक गेल्यामुळे अक्षरशा खरिपाच्या पिकांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. चातकासारखी पावसाची वाट पाहण्यात येत होती व त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु पुन्हा एकदा दोन-तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी परत एकदा चिंतेत सापडले आहेत. परंतु आता हवामान विभागाच्या माध्यमातून एक आनंददायी बातमी समोर येत असून त्यामुळे नक्कीच चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 राज्यात वाढणार पावसाचा जोर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असून तसेच दक्षिणेकडे मान्सूनचा  सरकलेला आस पूरक ठरत असल्यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या दोन-तीन दिवस चांगला पाऊस झाला परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली आहे. यावर्षी पावसाच्या सगळ्या स्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. परंतु या परिस्थितीत आज विदर्भ तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

यामध्ये जर आपण विदर्भातील पूर्व भागाचा विचार केला तर या ठिकाणी अधिक पावसाचा जोर राहील अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिला आहे अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून 15 सप्टेंबर 2023 म्हणजेच आज रोजी राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,

जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, अकोला, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच नंदुरबार, धुळे,बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यात विजासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.