Maharashtra Rain:- यावर्षी भारतात अंदमान निकोबार बेटांपासून तर केरळ पर्यंत झालेली मान्सूनची वाटचाल अतिशय सकारात्मक आणि समाधानकारक राहिली. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील काही दिवस अगोदर मान्सूनचे आगमन झाले. या सगळ्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस झाला व खरिपाच्या पेरण्यांना देखील वेग आल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे.
या सगळ्या समाधानकारक परिस्थितीमध्ये मात्र राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे व याला कारणीभूत ठरली आहे ती नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल होय. कारण सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची म्हणजेच मान्सूनची वाटचाल अडखळली असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे आता राज्यात परत एकदा ढगाळ हवामानासोबतच उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवू लागला आहे.
राज्यात ओसरला पावसाचा जोर
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल काही अंशी अडखळली असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यांमध्ये ढगाळ हवामान असून उन्हाचा चटका देखील वाढला असून त्यामुळे उकाडा जाणवत आहे. परंतु आज मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
जर आपण रविवार म्हणजेच कालचा विचार केला तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात, विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. परंतु मान्सूनची शाखा अडखळल्यामुळे विदर्भात अजूनपर्यंत चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
चिंतेची बाब म्हणजे मान्सून ज्या भागांमध्ये दाखल झालेला आहे त्या ठिकाणी देखील पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.पाऊस नसल्यामुळे विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 40 अंशच्या पार गेला आहे.
कशी आहे सध्या मान्सूनची स्थिती?
मान्सून संपूर्ण कोकण तसेच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आगेकूच केलेली आहे. 12 जून पर्यंत जर आपण मान्सूनची वाटचाल पाहिली तर ती विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत पाहायला मिळाली.
परंतु त्यानंतर मात्र मान्सूनची चाल मंदावली असून काल म्हणजेच रविवार पर्यंत मान्सूनच्या वाटचालीत कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही. खानदेश तसेच पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी अजून चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आहे वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा
जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार…
मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर
मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली
विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर
या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.