सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असून उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे. अशीच परिस्थिती भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये देखील आहे. साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा अंगाची लाहीलाही करणारी उष्णता जाणवते तेव्हा आपल्या कानावर उष्णतेची लाट हा शब्द कायम पडत असतो किंवा वाचण्यात तरी येत असतो.
अशावेळी आपल्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न येत असेल की नेमके कोणत्या वेळी उष्णतेची लाट आहे असे म्हटले जाते? किंवा उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट नेमका केव्हा जाहीर केला जातो? इत्यादी अनेक प्रश्न बऱ्याचदा येत असतील.
महाराष्ट्राचे तापमान पहिले तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ते 41 अंशाच्या पुढे असून भारतातील दिल्ली तसेच चंदिगड व इतर प्रमुख शहरांमध्ये देखील 44 अंशापर्यंत तापमान पोहोचल्याची नोंद झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण उष्णतेची लाट म्हणजे नेमके काय? याबद्दलची माहिती बघू.
उष्णतेच्या लाटेचा इशारा म्हणजे नेमका काय?
जर आपण हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दिलेली माहिती बघितली तर त्यानुसार मानवाच्या शरीरासाठी घातक ठरणारी हवेच्या तापमानाची स्थिती म्हणजेच उष्णतेची लाट होय अशा प्रकारचे वर्णन यामध्ये करण्यात आलेले आहे. प्रत्येक भागामध्ये असलेल्या सामान्य तापमानापेक्षा त्यामध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.
त्यामुळे प्रत्येक भागामध्ये असलेले सामान्य तापमान व त्यामध्ये होणारी वाढ यातील तफावत यावरून उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेता येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर समुद्रकिनारी भागातील जिल्ह्यांमध्ये जर कमाल तापमान 37 अंशाच्या वर गेले तर हा उष्णतेच्या लाटेचा पहिला निकष आहे व तेव्हा अशा ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.
तर मैदानी भागांमध्ये चाळीस अंश तापमानाचा निकष आहे व डोंगराळ भागांमध्ये 30 अंशाचा निकष आहे. जर हवामान उपविभागातील दोन स्थानकांवर तापमानाची ही परिस्थिती सलग दोन दिवस राहिली तर उष्णतेची लाट असल्याची घोषणा हवामान विभागाच्या माध्यमातून केली जाते.
उष्णतेची तीव्र लाट म्हणजे नेमके काय असते?
समजा जर एखाद्या भागांमधील तापमान हे त्याच्या सरासरीपेक्षा साडे चार ते 6.4 अंशांनी जास्त नोंदवले गेले तर त्या ठिकाणी उष्णतेची लाट जाहीर केली जाते व कमाल तापमान 6.4 अंशाने सरासरी जास्त नोंदवले गेले तर उष्णतेची तीव्र लाट जाहीर केली जाते
उष्णतेच्या लाटेसाठीचा रेड अलर्ट कधी दिला जातो?
ज्या भागांमध्ये दोन पेक्षा जास्त दिवस उष्णतेची तीव्र लाट दिसून आली आहे किंवा तीव्र उष्ण लहरी असणाऱ्या दिवसांची एकूण संख्या सहा दिवसांपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट जाहीर केला जातो. या दरम्यान उष्माघाताची समस्या सर्व वयोगटांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर गर्भवती महिला तसेच बालके व काही व्याधी असलेले व्यक्ती यांना या काळात खूप काळजी घ्यावी लागते.
उष्णतेची लाट असल्यास काय काळजी घ्यावी?
1- यात महत्त्वाचे म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये जाऊ नये व विशेषता दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान बाहेर न पडता घरातच राहावे.
2- जर बाहेर काही कामानिमित्त जायचे असेल किंवा काही काम करायचे असेल तर डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरावी. शक्य असेल तर डोके तसेच मान, हातपाय व चेहरा इत्यादी भाग ओलसर कापडाने झाकून घ्यावा.
3- तहान लागली नसेल तरीदेखील भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
4- या कालावधीमध्ये हलके तसेच फिकट रंगाचे सैलसर सुती कपडे परिधान करावेत. काही कारणास्तव उन्हामध्ये जायचे असेल तर संरक्षणार्थ टोपी तसेच गॉगल इत्यादींचा वापर करावा.
5- दारू तसेच चहा, कार्बोनेटेड शीतपेय व कॉफी इत्यादी या कालावधीत पिणे टाळावे. कारण यामुळे शरीराचे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त या कालावधीत लस्सी, लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी, ताक आणि ओआरएसचे सेवन करणे गरजेचे आहे.