अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. लसीकरण केंद्रावर दुसर्‍या डोससाठी लसीकरण चालू होते. मात्र लोकांनी पाठ फिरवल्यामुळे लसीचे डोस शिल्लक राहू लागले. त्यामुळे पहिल्या डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणि अचानक पहिल्या डोसचे लसीकरण चालू झाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी गेटची साखळी तोडली तर काहीनी गेट तोडून आत प्रवेश केला. काहींना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे अर्धवट लसीकरण थांबवावे लागले. तसेच पोलिसांना पाचारण करावे लागले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शनिवार रोजी लसीकरणाच्या दुसर्‍या डोससाठी दोन दिवसापासून नागरिक येत नसल्यामुळे पहिला डोस देण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गेट तोडून नागरिक आतमध्ये गेल्याने मोठा गोंधळ उडाला काहींना धक्काबुक्कीही झाली.

हा प्रकार काल रात्रीपर्यंत सुरु होता. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार लसीकरण केंद्रावर हजर झाले व चौकशी करुन याबाबत माहिती घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह सर्व पक्षीय लोक उपस्थित झाले.

त्यांनी यावर नियोजन करुन लसीकरण सुरळीत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. लसीकरणात वशिलेबाजी; नागरिकांनी फिरवली पाठ एकीकडे नागरिकांनी लसीकरण करावे म्हणून जाहिरातबाजी केली जाते तर दुसरीकडे श्रीरामपुरात लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा अजब प्रकार पहायला मिळत आहे.

त्यामुळे अगोदर वशिलेबाजी करणार्‍यांचे लसीकरण करुन घ्या नंतर आम्हाला बोलवा , अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.