file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- तलाठी असल्याची बतावणी करून एका वृद्ध महिलेची फसवणुकीची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडला आहे.

बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस येतील, अशी बतावणी करून अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार राहुरी शहरातील नवी पेठेमध्ये भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे.

राहुरीतील स्टेशनरोड येथे राहणार्‍या जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकृष्ण रघुनाथ अळसुंदेकर (वय 75) यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. दरम्यान याप्रकरणी अळसुंदेकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

जिल्ह्यात नेमके चाललंय काय ? पोलीस प्रशासन करतंय काय ? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अळसुंदेकर नवी पेठेतील ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढायला गेले असता

आधीच पाळत ठेवणार्‍या दोघांनी अळसुंदेकर गाडी लावत असताना त्यांना हटकत आम्ही पोलीस आहोत, सध्या पोलीस अधिकारी चेकींग करत असल्याने तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगून बतावणी केली.

अळसुंदेकर यांनी विश्वास ठेवून गळ्यातील लॉकेट आणि हातातील दोन अंगठ्या (अंदाजे एक लाख रुपये) आपल्या शबनममध्ये ठेवल्या.

ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढल्यानंतर काहीवेळाने आपल्याकडील लॉकेट व अंगठ्या लांबविल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ जवळच्या लोकांना व पोलिसांना संपर्क साधला. याप्रकरणी आळसुंदेकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.