Wheat Farming : रब्बी हंगामात गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाची पेरणी वेळेवर केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. मात्र अनेक शेतकरी बांधवांना गहू पेरणी वेळेवर करता येणे शक्य होत नाही.

अशा शेतकरी बांधवांनी उशिरा गहू पेरणी करताना काही सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे जेणेकरून त्यांना अधिक उत्पादन मिळू शकेल. कृषी तज्ञांच्या मते वेळेवर गहू पेरण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा एक महिन्याचा कालावधी सर्वोत्कृष्ट असतो. मात्र या कालावधीत बहुतेक शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करता येणे शक्य होत नाही. मग असे शेतकरी बांधव गव्हाच्या उशिरा पेरण्यासाठी उपयुक्त जातींची पेरणी करत असतात.

आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उशिरा पेरणीसाठी उपयुक्त असलेल्या गव्हाच्या वाणाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत उशिरा गहू पेरणी केली जाते. 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त 15 डिसेंबर पर्यंतच गव्हाची पेरणी करावी अन्यथा उत्पादनात घट होऊ शकते. या ठिकाणी शेतकरी बांधवांनी उशिरा गहू पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. हेक्टरी 125 ते 150 किलो गव्हाचे बियाणे उशिरा गहू पेरणी करताना वापरले पाहिजे. आता आपण उशिरा पेरणीसाठी उपयुक्त गव्हाचे वाण जाणून घेऊ.

एच डी-२१८९ :- पेरणी केल्यानंतर 115 ते 120 दिवसात या जातीचा गहू काढण्यासाठी तयार होतो. हेक्टरी 40 ते 45 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे एक बुटक वाण आहे. या जातीची वेळेवर देखील पेरणी केली जाते तसेच उशिरा पेरणीसाठी देखील या जातीचा उपयोग होतो.

कैलास (पीबीएन-१४२) :- गव्हाच्या या जातीची पेरणी केल्यानंतर साधारण 115 ते 120 दिवसात उत्पादन मिळते. 32 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला असून उशिरा पेरणीसाठी या जातीच्या गव्हाचा उपयोग होतो.

निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) :- वर नमूद केलेल्या जातीपेक्षा गव्हाची ही जात लवकर उत्पादन देण्यास तयार होतो. साधारण 105 ते 110 दिवसात यापासून उत्पादन मिळते. या जातीपासून 35 ते 40 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

बागायती भागात उशिरा पेरणीसाठी योग्य जात म्हणून ओळखली जाते. गव्हाची ही जात तांबेरा रोगास रोगप्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला असून चपाती बनवण्यासाठी या जातीचा गहू सर्वोत्कृष्ट असतो यामुळे बाजारात मागणी असते. 

फुले समाधान- (एनआयएडब्लू-१९९४) (एनआयएडब्ल्यू-१९९४) :- या जातीच्या गव्हाची वेळेवर तसेच उशिरा पेरणी करता येणे शक्य असते. गव्हाची ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात आला आहे. ही जात मावा किडीला प्रतिकारक आहे.

तसेच या जातीपासून उत्पादित झालेला गहू चपातीसाठी सर्वोत्कृष्ट असतो. या जातीचा गहू पेरणी केल्यापासून 105 ते 110 दिवसात उत्पादन देण्यास तयार होतो. या जातीच्या गव्हापासून 45 ते 50 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा जाणकार लोकांकडून करण्यात आला आहे.