file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  केंद्र सरकारकडून मिळणारी अपूरी लस लसीकरणात येणार्‍या अडचणी यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 24 टक्के लोकांनी पहिला, तर 9 टक्के लोकांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अशी परिस्थित राहिल्यास जिल्ह्यात करोनाचे शंभर टक्के लसीकरण कधी पूर्ण हा प्रश्‍न आहे.

यातच कोरोनाचा धोका पुन्हा उद्भवू लागला आहे. यामुळे लसीकरण वेगाने होणे गरजेचे बनू लागले आहे. जिल्ह्यात 38 लाख 87 हजार 545 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 9 लाख 35 हजार 132 नागरिकांना पहिला डोस, तर 3 लाख 60 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

असे एकूण आतापर्यंत 12 लाख 95 हजार 336 डोस संपले आहेत. यात कोविशिल्ड लसीचे10 लाख 1 हजार 670 डोस, तर कोव्हॅक्सिन लसीचे 2 लाख 76 हजार 580 डोसचा समावेश आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून करोनाने पुन्हा डोकवर काढण्यास सुरूवात केली आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले असले तरी संसर्ग वाढतांना दिसत आहे. करोनावर मात करण्यासाठी एकतर सामुहिक प्रतिकार शक्ती अथवा शंभर टक्के असे पर्याय असल्याने जिल्ह्यातील करोना लसीकरणाचा वेग पाहिल्यास जिल्ह्यासाठी पुढील काळ खडत असल्याचे चित्र सध्या आहे.