file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे.

यातच राज्यात गुटखा विक्री व साठा करण्याला बंदी असतानाही संगमनेर शहरात मात्र दोन दिवसांपासून पुन्हा खुलेआम गुटखा विक्री सुरू झाली आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

संगमनेर शहरात मात्र ही बंदी झुगारून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होत होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुटखाविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. गुटखा विक्रीला परवानगी द्यावी यासाठी संबंधित गुटखा विक्रेत्यांनी मोठे प्रयत्न केले.

त्यांच्या या प्रयत्नाला यशही आले असून दोन दिवसापासून शहरांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू झाली आहे. मात्र आता या गुटखा विक्रेत्यांना यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या बेकायदेशीर गुटखा विक्री मध्ये स्थानिक अधिकार्‍यांचा ही हात आहे.

गुटखा विक्रेत्याकडून दरमहा वसुलीसाठी एका कर्मचार्‍याची खास नियुक्ती करण्यात आली असून हा कर्मचारीही त्याचा लाभ करून घेताना दिसत आहे.

शहरातील अवैध व्यवसाय बंद असल्याबाबत चर्चा करणार्‍या अधिकार्‍यांच्या कारकिर्दीत शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा विक्री सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संगमनेरातील गुटखा विक्रीकडे लक्ष घालून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.