file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत.

यातून फेसबुक, इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन करणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो शेअरिंग, लाइव्ह व्हिडीओ, कॉलिंग अशा अनेक फिचर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याचाच गैरफायदा सायबर हॅकर्स व फ्रॉड करणारे घेत आहेत.

यामुळे अनेक फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सॲपच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे. सराईत सायबर गुन्हेगारांसह ओळखीचे लोकही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेचे बनावट अकाउंट तयार करून अश्लील फोटो, मेसेज व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ब्लॅकमेलिंग, बदनामी याच स्वरूपाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. तरुण मुलींसह अनेक ज्येष्ठ महिलांचीही वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांकडे दाखल अर्जातून निदर्शनास आले आहे.

बनावट रूप धारण करून फसवणूक करत असल्याने अशा गुन्हेगारांना शोधणे कठीण असते. यामुळे सोशल माध्यमांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा आपणही फसवणुकीच्या घटनेला बळी पडू शकतात.

यासाठी सोशल माध्यमांवर आपली खासगी माहिती, फोटो आदी गोष्टी शेअर करणे टाळावे असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.