अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून, क र्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था अंतर्गत, शारदा महिला संघ तसेच ॲग्रो पणनच्या माध्यमातून मतदारसंघातील २० बचत गटांना २३ लाख १२ हजार रुपयांचे धनादेश कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

महिला सक्षमीकरणासाठी कायम पुढे असलेल्या सुनंदा पवार यांनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता ‘गाव तिथे महिला उद्योजक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येत असुन आ. रोहित पवार हे देखील लक्ष घालत आहेत.

‘बचत गटांच्या माध्यमातून महिला शेळीपालन, कुक्कुट पालन, पत्रावळी, द्रोण,दुग्ध व्यवसाय, कागदी पाकिटे, पोस्टकार्ड आदी व्यवसाय प्रभावीपणे करणार आहेत. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या, कर्जत जामखेडच्या ५०० बचत गटातुन ५००० महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यात समृद्ध गाव संकल्पच्या महिलांचाही समावेश आहे.

या सर्व महिलांना एकत्र करून ‘उमेद’ या संस्थेच्या आधारे सरकारशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचाही फायदा संबंधित गटांना होणार आहे.

पणनचा अतिरिक्त फायदा देखील बचत गटांना होणार आहे. महिलांची बचत यामध्ये सुरक्षित राहील आणि सभासदत्व काढल्यानंतर मागाल तेंव्हा तुमची बचत सुरक्षित परत दिली जाईल. ज्या गावात १२ ते १५ बचत गट असतील तर त्या ठिकाणी ‘ग्रामसंघ’ तयार करण्यात येणार आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या गावात कार्यालय देखील असणार आहे.