file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पावसाची वाट पाहणारा बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर त्याने पेरणीची कामे हाती घेतली आहे. शेतीसाठी आता खतांची मागणी वाढलेली असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नगर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी बफर स्टॉक करून ठेवलेल्या युरीयाच्या साठ्यापैकी 205 मेट्रीक साठा अन्य तालुक्यांना परस्पर वाटप करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे हा सगळा कारनामा कृषी विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक पारपडली. यावेळी नगर तालुक्यातील युरीया खताचा बफर स्टॉकचा विषय काढण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या खतांच्या नियंत्रण समितीच्या बैठकीत नगर तालुक्यासाठी 676 मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश कृषी उद्योग विकास मंडळाला देण्यात आले होते.

मात्र, या मंडळाच्या अधिकार्‍यांनी परस्पर तालुक्याचा युरीया खतांचा स्टॉक परस्पर अन्य तालुक्यांना वाटप केला. याबाबत कोणालाही कल्पना दिली नाही. याबाबत उघड झाल्यानंतर महामंडळाच्या संबंधीत अधिकार्‍याला स्थायी समितीच्या बैठकीला बोलविण्यात आले होते.

मात्र, संबंधीत अधिकारी बैठकीकडे फिरकलेही नाहीत. या प्रकाराबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणी थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.