शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांपैकी शेळीपालन हा व्यवसाय कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून अगदी कमी भांडवलात तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करून अल्पावधीत चांगला पैसा या माध्यमातून कमवू शकतात.
याच कारणामुळे आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील शेळी पालन व्यवसायाकडे वळल्याचे आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने म्हणजे शेळी पालन व्यवसायामध्ये आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे त्याचा देखील फायदा या व्यवसायात करून चांगले यश मिळवता येणे शक्य झाले आहे.
शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी ज्या प्रकारे शेळ्यांचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे आहे. अगदी त्याचप्रमाणे संगोपनाकरिता उत्तम जातिवंत दर्जाच्या शेळ्यांच्या जातींची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते.
त्यामुळे उत्तम जातीच्या शेळ्यांच्या संगोपन करून कमी कालावधीत चांगला नफा मिळवता येतो. त्या अनुषंगाने आपण या लेखात शेळ्यांच्या अशा दोन जाती बघणार आहोत ज्या शेळीपालन व्यवसायामध्ये अतिशय फायदेशीर सिद्ध होऊ शकतात.
शेळीपालनात या शेळ्यांचे संगोपन ठरेल फायद्याचे
1- भाखरवाली शेळी– तसे पाहायला गेले तर शेळीची ही प्रजात जम्मू-काश्मीर राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. शारीरिक रचनेच्या दृष्टिकोनातून बघितले तर ही पांढरा आणि काळ्या रंगाची येते व शिंगे खालच्या बाजूने वाकलेले असतात. याशिवाय या शेळीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दूध आणि मांस उत्पादनाकरिता या शेळ्या पाळल्या तर आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होऊ शकतो.
भाखरवाली जातीच्या शेळीची दूध उत्पादन क्षमता उत्तम असून दररोज ती सरासरी 900 मिली दूध देते. या जातीच्या मादी शेळीचे वजन 50 किलो तर नराचे वजन 60 किलो पर्यंत असते. त्यामुळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या शेळीचे जर पालन केले तर अल्पावधीत चांगला नफा मिळवून प्रगती करता येऊ शकते.
2- नंदीदुर्गा शेळी– शेळीची ही प्रजात प्रामुख्याने कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. शारीरिक रचना बघितली तर हिचा चेहरा, पायाची खूर आणि डोळ्यांच्या पापण्या काळा रंगाच्या असतात. मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असेल तर नंदीदुर्गा जातीच्या शेळ्या फायद्याच्या ठरतात.
या जातीच्या शेळीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही एका वेतात जुळ्या पिल्लांना जन्म देते व त्यामुळे साहजिकच शेळीपालन व्यवसाय मध्ये नफा देखील दुप्पट होण्यास मदत होते. नंदीदुर्गा जातीच्या मादी शेळीचे वजन 25 ते 42 किलो आणि नराचे वजन 56 किलो पर्यंत असते. मांस उत्पादनासाठी नंदीदुर्गा शेळीचे पालन खूप फायद्याचे ठरते व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो.