Gold Loan Tips: गोल्ड लोन बँक,नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे की सोनाराकडून? कुठे राहिल फायदा? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
gold loan

Gold Loan Tips:- जेव्हा एखाद्या वेळेस आपल्यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व अशावेळी मात्र जितका पैसा आपल्याला हवा असतो तितका आपल्याकडे नसल्यामुळे आपण कर्जाचा पर्याय स्वीकारतो.

यामध्ये एक तर आपण नातेवाईक किंवा मित्र परिवाराकडून हातउसने किंवा कर्जरुपाने पैसे घेतो किंवा बँकांचा दरवाजा ठोठावतो किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायचा प्रयत्न करतो. यामध्ये वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन घेतले जाते व दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे गोल्ड लोन म्हणजे सोने तारण ठेवून त्या सोन्यावर कर्ज घेतले जाते.

गोल्ड लोन हे सुरक्षित प्रकारातले कर्ज असल्यामुळे तुम्ही सोनं गहाण ठेवले की लगेच तुम्हाला रक्कम मिळते व जास्त प्रमाणात कागदपत्र द्यायची गरज देखील भासत नाही. सोने हे एक मौल्यवान असल्यामुळे ते गहाण ठेवताना गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते.

तसेच तुम्ही सोने कुणाकडे नेमके गहाण ठेवणार आहात व त्यांचा व्याजदर काय आहे? या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला जर सोने गहाण ठेवून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँक,

सहकारी बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या तसेच सोनाराकडून किंवा सोन्याची पेढी किंवा खाजगी सावकार या सर्वांकडून कर्ज घेऊ शकता. परंतु या सगळ्यांचे व्याजदर आणि कर्ज देण्याची पद्धतीत खूप बदल असतो. त्यामुळे व्यवस्थित माहिती घेऊनच सोने तारण ठेवून कर्ज घेणे फायद्याचे ठरते.

 ज्यांना अधिकृत परवानगी आहे त्यांच्याकडूनच गोल्ड लोन घ्यावे

तुम्हाला जर सोने तारण ठेवून कर्ज घ्यायचे असेल यामध्ये आपल्याला माहित आहे की तुम्हाला ते कर्ज परत केल्यावर तुमचे सोने पुन्हा घ्यायचे आहे. त्यामुळे सोने तारण ठेवताना आणि ते सोने सोडवताना सोन्याची शुद्धता तपासून घेणे खूप महत्त्वाचे असते.

कारण अशा व्यवहारांमध्ये बऱ्याचदा लोकांची फसवणूक होते. या प्रकारची होणारी फसवणूक जर तुम्हाला टाळायचे असेल तर विश्वासार्ह आणि सरकारने अधिकृतरित्या परवानगी दिलेल्या यंत्रणा कडूनच गोल्ड लोन घेणे फायद्याचे ठरते.

 गोल्ड लोनसाठी बँका ठरतात उत्तम पर्याय

देशातील राष्ट्रीयकृत सरकारी, खाजगी बँकांपासून ते सहकारी बँकांच्या माध्यमातून गोल्ड लोन दिले जाते.परंतु या सगळ्यांमध्ये गोल्ड लोन करिता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रकृत बँकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. जेव्हा बँकांच्या माध्यमातून सोने तारण म्हणून घेतात तेव्हा सोन्याची शुद्धता तपासून घेतली जाते व ते किती कॅरेटचे सोने आहे

व त्याचे सध्याची बाजारपेठेतील किंमत किती आहे? या सगळ्या गोष्टी तपासून त्याचे मूल्य ठरवून ग्राहकाला ते तारण ठेवून नेमके किती पैसे द्यावे लागतील हे बँकेकडून सांगितले जाते. तसेच त्या कर्जावर आकारला जाणारा व्याजदर हा खूप मोठा प्रभाव पडणारा घटक असल्यामुळे त्यावर देखील लक्ष द्यावे.

इतर पर्यायांच्या तुलनेत सरकारी बँकांचे व्याजदर तुलनेने कमी असण्याची शक्यता असते. आपण जेव्हा आपले सोने ठेवायला जातो तेव्हा ते नेमके किती कॅरेट्स आहे किंवा आपण ते किती रुपयांना विकत घेतले होते याची पडताळणी करणे देखील गरजेचे आहे.

जेव्हा आपण बँकेमध्ये सोने तारण ठेवतो तेव्हा बँक त्याचा करारनामा करून घेते व यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात. त्या सर्व गोष्टी तपासून व सोन्याची सुरक्षितता म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

 नॉन बँकिंग फायनान्स कंपनी लगेच गोल्ड लोन देतात पण….

नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या बँकांच्या तुलनेमध्ये ताबडतोब कर्ज उपलब्ध करून देतात. बँकांपेक्षा त्यांचा व्याजदर जास्त असण्याची शक्यता असते व त्यांचे नियम देखील वेगळे असतात. त्यामुळे सोन्याची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून बँकेतूनच गोल्ड लोन घेणे फायद्याचे ठरते.

त्यासोबतच सोनार आणि खाजगी सावकार तसेच सोन्याची पेढी चालवणारे सोनार हे देखील गोल्ड लोन देतात. परंतु अशा व्यक्तींकडून गोल्ड लोन घेताना जोखीम तर असतेच परंतु त्यांचा व्याजदर देखील प्रचंड असू शकतो. तर तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

बऱ्याचदा तुम्ही ठेवाल 24 कॅरेटचे सोने व तुम्हाला परत करताना मिळेल 23 किंवा 18 कॅरेटचे. त्यामुळे सोन्याची फसवणूक होण्याची शक्यता व जास्त व्याजदर हे सगळे मुद्दे जर डोळ्यासमोर ठेवले तर बँकेतूनच सोने तारण कर्ज घेणे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe