७ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : शेवगाव मजुरांची ऊस तोडणीसाठी असणारी नकारघंटा, साखर कारखान्यांसोबत करार करूनही मजूर निघून जात असल्यामुळे मुकादमाचे व कारखान्याचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी साखर कारखान्यांचा हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेवगाव तालुक्यातील तालुक्यातील केदारेश्वर, गंगामाई तर पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर तसेच नेवासा तालुक्यातील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी तर मुळा सहकारी व नव्याने सुरू झालेला स्वामी समर्थ साखर कारखाना येथे आहेत.
साखर कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊस तोडणी ठेकेदार व वाहतूक ठेकेदार यांच्याशी करार केले जातात. आगाऊ रक्कम संबंधित करार केलेल्या ठेकेदारांना देण्यात येते. त्यानंतर गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदार मजुरांना घेऊन कारखान्यावर येतात, तेथून त्यांना तोड दिलेल्या ठिकाणी जावे लागते.
अलीकडल काही वर्षात ठेकेदाराने पलायन करणे, ऊसतोड मजुरांनी कामे अर्धवट सोडून निघून जाणे, असे प्रकार वाढले, शिवाय ऊसतोड कामगारांची कमतरताही जाणवत आहे. साऱ्यांचा कारखान्याच्या गाळपावर विपरित परिणाम होत आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसानही होत आहे. तसेच ठेकेदारांना दिलेल्या आगाऊ रकमेची वसुली करण्यात अडचणी येते त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांचा कल हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याकडे वळाला आहे.
पशुधनाला वाढे मिळेना
ऊसतोडणीच्या हंगामात पशुधनाला चारा म्हणून वाढे उपलब्ध होतात. हे वाढे शेतमालक तसेच ऊसतोड मजूर हिश्शाने घेतात, त्यामुळे दोघांनाही आर्थिक फायदा मिळतो. मात्र, हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्यामुळे वाढे मिळत नाही, परिणामी पशुधनाचा हक्काचा चारा हिरावला जातो.
हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीचे फायदे
ऊसतोड वेगाने होत असल्याने वेळेची बचत होते. दोन ते तीन तासांत एक एकर ऊस तोडणी होते. पाचट कुट्टी करण्याची आवश्यकता लागत नाही. ऊस फुटवा चांगल्या पद्धतीने होतो.शेवगाव तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे व वेळेत ऊस तोडणी होत नसल्याने तसेच कमी वेळेत तोडणीची कामे करण्याच्या दृष्टीने आता साखर कारखान्यांकडून हार्वेस्टरला प्राधान्य दिले जात आहेत. परिणामी यंदाच्या गळीत हंगामात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.