अहिल्यानगरमध्ये विमानातून पडला ४५३ किलोचा भला मोठा जिवंत बाॅम्ब, एक महिन्यानंतर भारतीय सैन्याने बाॅम्ब केला निकामी

वरवंडी (ता. राहुरी) येथे २४ मार्चला जेट विमानातून पडलेला ४५३ किलोचा जिवंत बॉम्ब भारतीय लष्कराच्या पथकाने ३० एप्रिलला निकामी केला. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा स्फोट टळला; एक किलोमीटर परिसर उध्वस्त झाला असता.

Updated on -

Ahilyanagar News: राहुरी- तालुक्यातील वरवंडी गावात २४ मार्च २०२५ रोजी दुपारी एका फायटर जेट विमानातून चक्क जिवंत बॉम्ब पडला होता. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. तब्बल एक महिना हा बॉम्ब तसाच पडून होता आणि परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर ३० एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्याच्या बॉम्ब डिस्पोजल स्कॉड (बीडीएस) पथकाने घटनास्थळी येऊन हा बॉम्ब निकामी केला. गुरुवारी हा बॉम्ब तिथून हलवण्यात आला असून, केके रेंज येथे त्याचा विस्फोट केला जाणार आहे, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली.

1 महिन्यांपूर्वी पडला होता बाँम्ब

२४ मार्चला दुपारी वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या जेट विमानातून हा बॉम्ब पडला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. बॉम्ब पडल्यापासून गावात दहशतीचे वातावरण होते. गावकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्लीतील संरक्षण विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर काल सकाळी पुण्याहून सैन्याचे बॉम्ब निकामीकरण पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकात नायक सुभेदार प्रकाश कोटगी, हवालदार प्रमोद हनमंताचे, हवालदार टी. कन्नन आणि हवालदार बी. एन. राव यांचा समावेश होता.

सुरक्षेत बाँम्बला केले निकामी

पथकाने जेसीबीच्या साहाय्याने सात फूट खोल खड्ड्यातून हा बॉम्ब काळजीपूर्वक बाहेर काढला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी त्यांना मदत केली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीही पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस आणि विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले.

४५३ किलो वजनाचा बाँम्ब

सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बॉम्ब साडेचार फूट लांब, चार फूट व्यासाचा आणि ४५३ किलो वजनाचा होता. सुदैवाने बॉम्बची पिन निघाली नव्हती, त्यामुळे तो फुटला नाही. जर तो फुटला असता तर एक किलोमीटर परिसर उद्ध्वस्त झाला असता आणि तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंपासारखे हादरे जाणवले असते. यात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती. पथकाने बॉम्बचा फ्युज काढून तो निकामी केला आणि एक मोठा अनर्थ टळला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News