नगर अर्बन बँक घोटाळा : बाळासाहेब थोरात यांच्या ‘त्या’ खंदे समर्थकाला अटक, लोकसभेपूर्वी नगरच्या राजकारणात मोठी खळबळ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत. या बँकेच्या घोटाळ्याचे सूत लांबत चालले आहे. आता या घोटाळ्यात एक मोठी कारवाई करण्यात आली असून संगमनेरमधून या घोटाळ्यातला एक मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे प्रख्यात उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. मात्र या कारवाईमुळे आगामी काळात नगरचे राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याचे कारण म्हणजे पोलिसांनी नगर अर्बन बँक घोटाळ्यात कारवाई करत ज्या अमित पंडित यांना अटक केली आहे ते बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. खरेतर, आज निवडणूक आयोगाने आगामी 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे.

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता नियोजित वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका होणार आहेत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीच संगमनेर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या एका खंदे समर्थकाला नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणात गजाआड करण्यात आले आहे.

यामुळे या कारवाईच्या टाइमिंगवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. निवडणुकीच्या पूर्वीच बाळासाहेब थोरात यांच्या खंदे समर्थकाला अटक झाली असल्याने याचे राजकीय पडसाद लवकरच उमटणार आहेत.

नगर अर्बन बँकेचा हा घोटाळा 250 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या तपासात बनावट कागदपत्रांसह मिळकतीचे दाखले व दस्त सादर करून संस्थेची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

यामुळे आता या महाघोटाळ्यात समाविष्ट असलेल्या संचालकांसह या प्रकरणांमध्ये ज्या कर्जदारांचा समावेश आहे त्यांना देखील गजाआड केले जाऊ लागले आहे. याचाच एक भाग म्हणून आज दुपारी संगमनेर शहर पोलिसांनी उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना अटक केली आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी पोलिसांना पंडित यांना अटक करण्याचे आदेश मिळाले तेव्हापासून पंडित यांचा मोबाईल बंद होता. त्यांचा कुठेच तपास लागत नव्हता. मग, दुपारी पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. संपूर्ण घर तपासले मात्र पंडित सापडत नव्हते. तथापि, पोलिसांना त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने पंडित त्यांच्या घरातच असल्याचे समजले होते.

यामुळे पोलिसांनी घराची कसून चौकशी घेतली आणि पंडित हे त्यांच्या बेडरूममध्येच सापडलेत. ते नाट्यमय पद्धतीने बेडरूममध्ये लपून बसले होते. पोलिसांनी पंडित यांना अटक केली शिवाय त्यांच्या घरासह त्यांच्या पेट्रोल पंपाचीही झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांची ही कारवाई मात्र सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी ठरत आहे.

एकंदरीत या कारवाईमुळे या घोटाळ्याच्या तपासाला गती मिळणार आहे, तर दुसरीकडे या कारवाईत ऐन निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या खंदे समर्थकाला अटक करण्यात आली असल्याने यावर राजकारण देखील तापणार आहे. स्वाभाविक या कारवाईच्या टाइमिंगवर आता प्रश्नचिन्हही उपस्थित होणार आहेत.