Ahmednagar News : ३०० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करण्याबाबत आदेश का दिला? या कारणावरून ग्रामस्थांनी संगमनेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास घेराव घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ३०० ग्रामस्थांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील सोसायटीमार्फत चालवले जात होते; मात्र या सोसायटीमधून अचानक धान्य देण्याचे बंद झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी काल गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला होता. तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक यांना ग्रामस्थांनी जाब विचारला होता. ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन स्वस्त धान्य दुकान सायखिंडी सोसायटीकडेच असावे, अशी मागणी केली होती.

तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक भालेराव हे कार्यालयात कामकाज करीत असताना सर्व ग्रामस्थ पुरवठा विभागासमोर आले. तुम्ही विलास आबाजी गुंजाळ यांना स्वस्त धान्य दुकान पुर्ववत करण्याबाबतचा आदेश का दिला? असा सवाल करून ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक भालेराव यांना घेराव घालुन धक्काबुक्की करून दमदाटी केली होती.

याबाबत पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष भालेराव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल गुंजाळ (रा. गुंजाळवाडी), रमेश किसन नागरे (राहणार शेडगाव, ता. संगमनेर), अनिल गुंजाळ, सुयोग गुंजाळ, नैना कैलास रहाणे,

किसन दत्तु गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्यासह अडीचशे ते तीनशे जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२४ नुसार भा. दं.वि. कलम ३५३, ३२३, १४३, १४७, १४९, ५०६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम १९५१चे कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.