Ahmednagar News : चार एकरांत ७८ टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन ! गुजरात, मुंबईत पसंती, अहमदनगरच्या शेतकऱ्याची कमाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :  अहमदनगरमधील आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेले काही प्रगतशील शेतकरी एक मोठा आदर्श निर्माण करत आहेत. विविध संकटाना तोंड देत व आधुनिक शेतीची कास धरत अहमदनगरमधील अनेक शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत.

नोकरीच्या मागे धावणारे तरुण व शेतीत दम नाही असे म्हणणारे शेतकरी यांच्यासाठी हे शेतकरी आदर्श ठरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील महाडिक नावाचे शेतकरी द्राक्ष शेतीतून मोठी आर्थिक उलाढाल करत आहेत. या शेतकऱ्याने द्राक्ष पिकातून ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.

केवळ चार एकरांत ७८ टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले. गुजरात, बडोदा, मुंबई या बाजारपेठांमध्ये द्राक्षाला चांगला भाव मिळाला. त्यामुळे महाडिक कुटुंबियांच्या समाधानाचे वातावरण आहे.

पारंपरिक पिकांना फाटा
हे शेतकरी कुटुंब याआधी कांदा, ऊस अशी पारंपरिक पिके घेत होते. परंतु या पिकांना बाजारभाव आणि खर्च यातील ताळमेळ पाहता आर्थिक प्रगती मात्र होत नव्हती. पाच वर्षांपूर्वी चार एकरांमध्ये सुपर सोनाका व एस. एस. एन. या दोन जातींच्या द्राक्ष पिकाची लागवड केली.

यातून ७८ टन द्राक्ष उत्पादन घेतले आहे. द्राक्ष बार धरण्यापासून मजुरी, औषधे याचा त्यांना एक लाख ७० हजार रुपये खर्च झाला आहे. मार्केटचा अंदाज घेऊन सतत नवनवीन प्रयोग करून विविध पिकांमधून उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो याचे उत्तम उदाहरण महाडिक यांनी दाखवून दिले आहे.

शेणखताचा वापर
महाडिक यांनी एप्रिल महिन्यात छाटणी केली. त्यांनी आपल्या बागेत रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय आणि शेणखताचा जास्त वापर केला. त्यांनी त्यांच्या शेतात एक एकरामध्ये शेततळे केले आहे.

विहीर व शेततळ्याच्या माध्यमातून द्राक्ष पिकाला पाण्याची सुविधा केली. दरम्यान अवकाळी पावसाने झोडपल्याने उत्पादन कमी निघाले असल्याचे महाडिक सांगतात. हे अवकाळी संकट नसते तर त्यांनी अधिक उत्पन्न मिळवले असते असा अंदाज आहे.