Shrigonda Accident : एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू,मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shrigonda Accident : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील डोकेवाडी फाट्यावर गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेआठ वाजता एसटी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.

यात दुचाकीवरील गौतम जयवंत छत्तिसे (वय ४१, रा. छत्तिसे वस्ती, भावडी, ता. श्रीगोंदा) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीवर ठपका ठेवत पाच तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

गुरुवारी जामखेडवरून श्रीगोंद्याच्या दिशेने जाणारी एसटी बस क्र. (एमएच ११, बीएल ९२३९) आणि श्रीगोंद्यावरून भावडीच्या दिशेने जाणारी दुचाकी क्र. (एमएच १२, सीएक्स ७२४०) यांची समोरासमोर धडक झाली.

यामध्ये दुचाकीवरील गौतम छत्तिसे यांचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी ठेकेदार कंपनी अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप केला.

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता दिलीप तारडे, शाखा अभियंता रावसाहेब धांडोरे, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, अनिल ठवाळ, सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, अमर छत्तिसे, पोपट छत्तिसे, संतोष सोनवणे यांची बैठक झाली.

ठेकेदार कंपनीकडून मृताच्या नातेवाईकांना मदत देणार असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. दुपारी दोननंतर वाहतूक सुरळीत झाली. एसटी चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी आल्याशिवाय मृतदेह हलविण्यात येणार नाही, असा पवित्रा घेत महामार्गावरील वाहतूक रोखली. यामुळे सुमारे पाच तास महामार्ग बंद होता.